« पुस्तक समिक्षण »
भरभरून आनंद देणार्या बालकवितांचा संग्रह 'आपण सारे...'
आजकालची पिढी खुपच टेक्नोसॅव्ही झाली आहे.अगदी लहान बाळही कसे मोबाईल हाताळतात,हे मोठ्या गर्वाने सांगणारी जोडपी आहेत. व्यस्त जीवनात मुलांचा आनंद, मनोरंजन म्हणजे टिव्ही, कार्टून, मोबाईलपुरतेच मर्यादीत झाले आहे. शिक्षणाचा रट्टा, करिअर यात बालपण कधी निघून जाते हे या पिढीला कळतच नाही. मात्र काही सुजाण पालक आणि शिक्षक अस्सल बालपणाचा आनंद बालकांना मिळवून देत असतात. चित्रकला, काव्य, नृत्य, संगीत याचा जीवनानंद त्यांना मिळतो. असे बालपण आपण प्रत्येकाने जगावे असे वाटते. याचाच एक पैलू म्हणजे मुलांना काव्यात्मक रूपातून मिळणारा आनंद. अगदी तान्ह्या बाळालासुध्दा अंगाईगीत ऐकल्याशिवाय झोप येत नाही. तेव्हापासूनच त्याला काव्याची गोडी लागत असते. मग आजीच्या गोष्टी, मामाचा गाव, प्राण्यांचं जग हे सर्व कथा-गोष्टींमधून ऐकायला मिळते. शाळेच्या अभ्यासक्रमातून वा बाहेरच्या जगातून का होईना हे सर्व साध्य होत असते. हे गोड अनुभव, जग आपल्या आयुष्यभरात आपण जपून ठेवत असतो. प्रत्येकात जसे स्त्रीमन असते तसेच बालमनही असते. ते प्रत्येकाने जगावे आणि आपल्या बालपिढीलाही जगू द्यावे. ही बालमनाची भूक भागवणे पालकांचे, शिक्षकांचे, माध्यमांचे काम आहे. यात साहित्यिक आपल्या कल्पनाशक्ती आणि शब्दसामर्थ्याचा वापर करुन बालकांना रिझवत असतात. त्यातून मुलांचे रंजन, मूल्यांची शिकवण आणि कल्पनाशक्तीला वाव मिळतो.
अशाच बालमनाचे जीवनविश्व समृद्ध करणार्या श्री. उमेश मोहिते लिखीत बालकवितांचा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. स्वत: शिक्षकी पेशा धारण केलेला असल्यामुळे मुलांचे विश्व काय असते, आणि ते कसे समृध्द करता येईल याची त्यांना चांगली जाण आहे.आपल्या शाळेतील काही लिहित्या मुलांचे साहित्य वर्तमानपत्रांकडे पाठवून प्रकाशित करून घेणे हा त्यांचा विशेष त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून जपला आहे. मुळ ग्रामीण कथा -कांदबंरीकाराचा पिंड असला तरी त्यांनी गेल्या दोनेक वर्षात हेतूपुरस्पर बालसाहित्याचे लेखन केले आहे. त्यांच्या ह्या बालकविता वेळोवेळी नामाकिंत दैनिकात आणि मासिकात प्रसिद्ध झाल्या असल्या तरी मुलांना बालकवितांचा एकत्रित ठेवा 'आपण सारे ' या पुस्तकाच्या रूपाने मिळाला आहे. यात एकूण २९ बालकविता असून त्या सर्व बालमनाचे वेगवेगळे पैलू आणि विश्व उलगडून दाखवतात. स्वप्नरंजनासाठी ते मुलांना परीच्या दुनियेत सैर करवून आणतात तर चांगलं रंजक स्वप्नही दाखवतात. प्रत्येक कवितेत गंमत असायलाच हवी तरच मुलांना आनंद मिळतो, ते तत्व त्यांनी प्रत्येक कवितेत पाळले आहे. शिवाय केवळ स्वप्नरंजन न करता मुलांवर त्यातून संस्कारही बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्ष जगातील व्यक्ती, सण, गोष्टींचा आधार घेतला आहे.जसे की, घर, बाबा, बहीण, आई, गुरूजी या सर्वांबद्दल मुलांना विशेष प्रेम असते. म्हणूनच ते आईबद्दलचं प्रेम ते व्यक्त करतात.बाबाबद्दल गर्वाने लिहतात, तर बहिणीबद्दल असलेली विशेष मायाही त्यांनी टिपलेली आहे.
बालकांना गोष्टी ऐकायला आवडतात. मग त्या आजीने सांगितल्या तर काय मज्जा ! त्यामुळे आजीचे वेगळेच स्थान असते. बालकांच्या मनातील मायावी छोटंसं घर मस्त खेड्यात वसलेले आहे. आणि हे त्यांच्यासाठी जगातील सर्वात सुंदर ठिकाण आहे. मुलांच्या मनातील शाळेतल्या गुरूजीबद्दलची खुपच छान भावना रेखाटली आहे. सवंगडी, मित्र यांच्यासोबतची मजा 'ऐक ना रे भाऊ', 'चला दोस्तांनो', 'ऐक माझ्या मित्रा' या बालकवितेतून वाचायला मिळते. यासोबतच रविवारही मुलांना खुप आवडतो. त्या दिवसाची आतुरता आणि आवड 'रविवार' कवितेत वर्णिली आहे. प्रत्येक बालकाला मामाचा गाव खुपच सुंदर वाटत असतो. मुलं सुटी घालवण्यासाठी तिकडे धाव घेतात. जवळच्या व्यक्ती, प्राणीजगत, शाळा, मित्र, मजा हेच लहानमुलांचे विश्व असते. शिवाय काही विशेष गोष्टींचे अप्रुप आणि आकर्षणही मुलांना वाटत असते. मग सुटी, पाऊस, पर्यावरण हे आलेच! पावसाबद्दल दोन कविता संग्रहात आहेत. बालमंडळी पावसात कशी मौजमजा करतात ते या कवितांत वाचायला मिळते.
जोडीला चिमणी, माकड अशा दोन प्राण्यांवर आधारित कविताही आहेतच. मुलाच्या तोंडी असलेली सहज -सोपी भाषा वापरून ह्या कविता समृद्ध केल्या आहेत. याशिवाय मुलांमुलीमधे भेद करू नये, भ्रुणहत्या, झाडे वाचवणे किती आवश्यक आहे हे मुलांच्या अंतरंगातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
एकंदरीत मौजमजा, आवडत्या व्यक्ती, स्थळे आणि प्राण्यांच्याबद्दल भरभरून बोलणार्या कवितांचा आनंद घ्यायला हे पुस्तक वाचायलाच हवे.
नांदेडच्या इसाप प्रकाशनाने हा बालकाव्यसंग्रह अतिशय देखण्या आणि तजेलदार स्वरूपात प्रकाशित केला आहे. प्रमोद दिवेकर यांचे आकर्षक मुखपृष्ठ आणि कवितांना काढलेली समर्पक रेखाचित्रे पुस्तकाला देखणं रूप देतात.
पुस्तक: आपण सारे... (बालकविता)
कवी: श्री. उमेश मोहिते
पाने: ४० मूल्य: रु. ५०
प्रकाशक: इसाप प्रकाशन, नांदेड
समिक्षण: रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905
« पुस्तक समिक्षण »
अस्वस्थ मनाचा वेध घेणारा कवितासंग्रह: 'कर्णाच्या मनातलं'
कवी देविदास सौदागर यांचा 'कर्णाच्या मनातलं' हा पहिलाच कवितासंग्रह नुकताच हातात आला. शिर्षकावरूनच हा संग्रह वेगळा असेल असे वाटले होते, आणि ते खरेच आहे. कवीने कर्णाच्या जागी स्वत:ला ठेवून मनाची दारं खुली केली आहेत. कर्णाची द्विधा, हतबलता आणि हरवलेपण त्यांनी त्यांच्या कवितांमधून उत्तमरीत्या रेखाटले आहे. 'हद्द' या कवितेत ती अवस्था ते कसे रेखाटतात, ते बघा:
रक्ताचं नात मोठं?
कि, जीव लावलेलं नातं मोठं?
उत्तर मिळेना झालंय
आजचं समाजमन बघितलं कि आपल्या प्रत्येकाला हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
जीवनातील कटशाहात स्वत:चा स्वाभिमान कसा जपला हे 'डाव-प्रतिडाव' या कवितेत कवीनं नमुद केले आहे. तसेच आपल्या जीवनाचा 'प्रवास' कसा झाला हेही मांडले आहे. या दुनियेच्या डावात पाठीत वार झाल्याची 'व्यथा' त्यांच्या कवीतेत दिसून येते.
पाठीवर वार करणारे
ते तर योध्दे शूरवीर होते
तर शेवटच्या कडव्यात
ते श्रेष्ठ धनुर्धर होते
पाठीतून हृदयात त्यांचे वार होते
अशीच अवस्था कवीने 'कांतैय', 'सूतपुत्र' आणि 'मुखवटे', 'घाव' या कवितांमधून रेखाटली आहे. जीवनातील वाईट अनुभवाबद्दल कवी भरभरून लिहितो.
अशात त्याची अवस्था
काळजात अडकले शब्द माझ्या
हुंदके बाहेर कसेतरी फुटू लागले
अशी होऊन जाते.
मग अशा अवस्थेत सामान्य माणसासारखी नशीबाला दोष देण्याची वेळ आणि हतबलताही कवीला येते.
'नशीब' कवितेत कवी म्हणतो,
सगळ्यांचं उजळलं आयुष्य
माझ्याच वेळेस तेल नव्हतं पणतीत
जगात दिसणारा स्वार्थ बघून कवीलाही
सोडावं वाटतं आता
म्हणणं माझं माझं
फेकून द्यावं मनावरचं
मोहाचं ओझं
असं वाटतं.
मात्र 'हस्तरेखा' कवितेत कवीचा आशावाद आणि कष्टावरची 'श्रध्दा'ही दिसून येते. भविष्य घडविण्याची ताकद फक्त हातात आहे हा विश्वास आणि इतर कवितांमधून दिसणारा 'स्वाभिमान' कवीला जगण्याचं बळ देतांना दिसतो. स्वाभिमान नसणं म्हणजे खरं मरण आहे हे कवी सांगायला विसरत नाही.
जीवनातील आव्हानं पेलण्याची धमक दाखवतांना कवी म्हणतो,
पाऊल टाकीन तिथं
जिंकण्याची धमक अाहे
माझा प्रामाणिकपणा
हे यशाचे गमक आहे
जातिव्यवस्थेबद्दलही कवीने भाष्य केले आहे.
काही वेगळ्या कविताही यात आहेत. त्यात प्रेमाची झलक आहेच. आठवणीबाबतीत कवी म्हणतो,
आठवणीचे किती
रूततात काटे
आठवणीला किती
फुटतात फाटे
प्रेमासोबत श्रृंगार आला नाही तर नवलच!
किती हे सुंदर
काळे काळे
बोलतात बघ
हे तुझे डोळे
प्रेमात कवी राधाही बनुन जातो 'कृष्ण' या कवितेत! 'सुर्यभक्ती' या कवीतेतून कवी प्रेयसीबद्दलची आसक्ती आणि भक्ती दाखवुन देतो.
त्यांचा हा पहिलाच कवितासंग्रह असून यात ३७ कविंतामधून त्यांचं मन, दशा, कोलाहल जवळून अनुभवता येते. बर्याच कवितांवर गझलेचा प्रभाव आहे किंवा गझलसदृशता आहे. त्यामुळे गेयताही ओघाने येतेच. मात्र कुठेकुठे मुक्तछंदाकडे झुकल्यासारखे वाटते. भावना व्यक्त करायला त्याचं बंधन किंवा व्यत्यय आला असे कधी झालेले जाणवत नाही आणि वाचकही गोंधळून जात नाही. मनाची दुर्दशा तसेच अंतर्मुखतेकडे झुकणार्या कविता असल्यातरी त्यातुन आशावादही डोकावतो.
हेच कवी देविदासजींच्या कवितांचं यश आहे. पहिला संग्रह असला तरी जुन्याजाणत्या कवीसारखी कवितांची गुंफन केली आहे. शंकर कसबे यांनी पुस्तकाला लिहलेली प्रस्तावणा पुस्तकाचा सारांश व्यक्त करते, तर उत्तम सदाकाळ यांचे शब्दही तशीच भावना व्यक्त करतात. मुखपृष्ठ समर्पक, पुस्तकाची बांधणी सुबक आहे. त्यांना पुढिल साहित्यलेखनास सुभेच्छा!
पुस्तकाचे नाव: कर्णाच्या मनातलं
कवी: देविदास महादेव सौदागर, तुळजापूर
प्रकाशक: थिकं टॅंक पब्लिकेशन, सोलापूर
पाने: ४४
किंमत: ८० ₹
समिक्षण: रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905
« पुस्तक समिक्षण »
मनाचा धांडोळा घेणारा काव्यसंग्रह 'कंगोरे मनाचे'
श्री. देविदास खडताळे यांचा 'मनाचे कंगोरे' हा कवितासंग्रह हे त्यांच प्रकाशित झालेलं नववं पुस्तक आहे. याचा अर्थ त्यांचं साहित्यातील 'व्याकरण' चांगलंच बळकट आहे. प्रतिमा, प्रतिकांचा मनाच्या अवस्था रेखाटण्यासाठी त्यांनी पुरेपूर वापर केलेला आहे, हे त्याचं काव्य वाचल्यावर कळतेच. पुस्तक वाचायला घेतल्यावर सुरवात मुखपृष्ठापासुन होत असल्यामुळे पुस्तकाचं नाव अाणि मुखपृष्ठचित्र याचा संबंध वाचक लावत असतो. शिवाय पुस्तकाच्या आत काय 'लिहून' ठेवलंय याचाही अंदाज घेत असतो. 'मनाचे कंगोरे'ला समर्पक आणि थोडंस गहन वाटणारं मुखपृष्ठ लाभलं आहेच. आता वळूया कवितांकडे.
एकून चाळीस पानाच्या छोटेखानी अंकात ३४ कविता असून जवळपास सर्व कविता मनाचे पैलू दर्शवतात. 'मन' हा शब्द म्हटला कि 'ती' बहिणाबाईची कविता आठवल्याशिवाय राहत नाही. देविदासजींचीही अशीच एक कविता आहे, मात्र त्यांच्या विशेष पठडीतली. कवीला मन हे पावसासारखं
कधी रिमझिम
कधी खट्याळ
कधी फटकारे
कधी विक्राळ
वाटतं.
आपण या जगाला स्वार्थी म्हणत असतो. मात्र समाजाचा अापणही भाग असतो, हेही खरंच! थोड्याफार प्रमाणात सारेच स्वार्थी असतात. कदाचित निर्सगनियमच बनुन गेलाय हा. या गुणामुळे (मुळात अवगुणच) माणसात काय विपरित बदल होतात हे देविदासही त्यांच्या बर्याच कवितांमधून मांडतात.
स्वार्थात गुरफटल्याने
कधी अमानुष्य होते मन
कधी माणुसकी हरवते
कधी विषण्ण होते मन...
मनाला स्वार्शी बनवणारे कंगोरेपण किती असतात. कधी हे मन हेकेखोर, अहंकारी, असत्य, अविश्वासू असं बरंच काही बनतं. या स्वार्थी मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. माणसाला येथील ऐहिक सुखाचा, मायेचा मोह आवरता येत नाही. अगदी अंतापर्यंत तो त्याला कवटाळून बसतो. सोबत काही येत नसूनही का बरं एवढा हव्यास करावा हा प्रश्नच आहे. कवीलाही हा प्रश्न पडल्यावाचून राहीला नाही. त्यासाठीच कि काय यावर उपाय म्हणून ही स्वार्थी नाती कशी माणुसकीने जपता येतील यासाठी आपण प्रयत्न करायला हवा असं तो म्हणतो. स्वार्थाची झापड लावणार्यांना माणुसकीने नागवण्याचा प्रयत्न आहे. हेवेदावे करणार्यांना आपलेपणाची जाणिव कशी करावी, अशी चिंताही आहे.
कधी मन फुलाचे कोंब होते तर त्याहूनही नाजूक पानावरील दवांचं मोतीरूप घेते. कधी लवचिक तर कधी कठोरही होते. त्याची ना खोली कळत, ना व्याप्ती.
'मनोमनी' कवितेतील एक कडवं यासाठी पुरेसं आहे.
मन किती खोलवर
मनघट्ट कितीतरी
खोलात खोलवर जसे
दगडात उमललेले फूल जसे
मनाची श्रध्दा हा सुध्दा एक भाग असतो. कुणी दगडावर तर कुणी माणसावरही श्रद्धा ठेवायला तयार होत नाही. शेवटी हा मनाचाच खेळ आहे. श्रध्दा आणि जोडीला क्षमतेच्या बळावर आपण हवं ते अपेक्षित साध्य करू शकतो. दगडाला गुरूस्थानी ठेवलेल्या श्रद्धेने आणि आपल्या कार्यप्रवणतेने यश मिळवु शकतो. कवीलासुध्दा याच क्षमतेवर श्रध्दा आहे. मग त्याला देवाला पुजलं काय किंवा आस्तिक असलो काय, नसलो काय याचा काही फरक पडत नाही. अशीच भूमिका 'श्रध्दाच', 'घाव' या कवितांमधून विषद केली गेली आहे. 'निरंतर' कवितेतून स्वत:ला शोधण्याचा सल्लाही दिला आहे.
दुःख सहन करणे हे काही नवीन नाही. प्रत्येकाला त्याचा सोस सोसावाच लागतो. कुणाला थोडं सहन करावं लागतं, तर कुणाला निखार्यावरून चालावं लागतं. रानातल्या भेसुर रात्रीने मनाचं फुलं उन्मळून जातं आणि मन निर्माल्यागत होऊन जातं. मनाचा हा गुणधर्म भुतकाळच्या आठवणीने आणखीनच अक्राळविक्राळ होतो. गुणधर्म कवितेत कवी म्हणतो,
मन माझे आक्रोश करी,
भूतकाळाच्या निखार्याने
जमलीय त्यावर राख
भूतकाळाच्या आठवणीने
अशाच विरक्ती आणि विरहाच्या जखमा भुतकाळात दडलेल्या असतात आणि आठवणीने मन व्याकुळ, बैचेन होतं. डोळे पाणावतात आणि मनात काहूर माजतं. अशी दशा 'विरक्ती' या कवीतेत मांडली गेली आहे. तसेच 'निखारे' या कवितेत,
आठवणी ओठातूनी
मन फसवूनी सुर गेले,
राखेतले निखारे
मन जाळून मैफल गेले
अशी आपली फसगत कवी मांडतो.
पण यातून मार्ग काढण्यासाठी मन धैर्य करतं. आशेची पालवी फुटायला लागते. मन वळवाचा पाऊस घेवुन येतो. असंच कुणीतरी मग 'उपासनिय' होतो.
मन वळवाचा पाऊस
आठवणीचे निखारे, शिंपत गेला,
करपलेल्या, भेगाळलेल्या
आठवणींना ओल देवून गेला
धैर्यांची आणि आशेची वाट लाभणारं मन सर्वांचंच असत नाही. कुणी परिस्थितीला शरण जाणारंही असतं. प्रतिकुलतेशी दोन हात करायला सर्वांनाच जमत नाही. दु:खातही आनंदी राहणं शिकलं पाहिजे असं वाटत राहातं. असे सर्व प्रश्न कवीला पडल्यावाचून राहत नाहीत. या प्रश्नांची उत्तरं ज्यानं त्यानं शोधायला हवीत.
एकंदरीतच या जगाच्या 'गर्दी'त मनाचे 'चढउतार' मनाचे सामर्थ्य सिद्ध करतात. नाहीतर हे आयुष्य 'कोडं' बनुन जाते. त्यात हा संग्रह मनाचा धांडोळा घेण्यात खरा उतरला आहे.
पुस्तक वाचताना त्याचं रसग्रहण केल्यावरच कवीचं किंवा लेखकाचं मन कळंत असतं. त्यानुसारच हे पुस्तक मनाचे कंगोरे समजून घ्यायला खरं उतरलं आहे असं मला वाटतं. राहिला प्रश्न यातील त्रुटींचा.
संग्रहाच्या नावाप्रमाणे विचार केला तर सर्व कविता एकाच विषयाला धरून असायला हव्यात. मात्र एक-दोन कविता विषयाशी फारकत घेणार्या ठरतात. त्यांऐवजी विषयाला धरून आणखी कवितांना संग्रहात जागा देता आली असती. तसेच या पुस्तकाला प्रस्तावना घेता आली असती तर आणखी बरे झाले असते. मनात वसलेल्या आप्तेष्टांना समर्पित केलली अर्पणपत्रिका सारं काही सांगुन जाते.
शेवटी, देविदास खडताळे यांना पुढिल साहित्यप्रवासास सुभेच्छा!
पुस्तक: कंगोरे मनाचे
कवी: श्री. देविदास खडताळे
प्रकाशक: वैशाली प्रकाशन, पुणे
मूल्य: रु. ७०
समिक्षण: रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905
माझं पहिलं ईबुक प्रकाशित झालं आहे,











