आभाळाची गुपिते सांगणारा अनोखा आणि पहिला किशोर काव्यसंग्रह

By Raghunath Sontakke - 01:37

« पुस्तक समिक्षण »

आभाळाची गुपिते सांगणारा अनोखा आणि पहिला किशोर काव्यसंग्रह
१४ जुलै २०१९ च्या विदर्भ मतदारमधे प्रकाशित
 

३० जून २०१९ च्या दै. सामना, उत्सवमधे प्रकाशित 
माणसाला अवकाशाबद्दल पुर्वीपासूनच कुतूहल वाटत आले आहे. अफाट अंतराळात कितीतरी ग्रह-तारे, धुमकेतू, आकाशगंगा असं बरंच काही पसरलेलं आहे. मानवाने आतापर्यंत अनेक अवकाशवार्‍या करून शोध लावले आहेत. त्याबद्दल अनेक संस्था आणि संशोधक कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना, मुलांना त्याविषयी शालेय शिक्षणाच्या माध्यमातून माहिती मिळत असते. असं असलं तरी कुतूहल आणि अधिकाधिक ज्ञान मिळवण्याची आस मुलांना लागतेच ! हे ज्ञान आणि माहिती काव्यात्मक रूपाने कुणी सादर केलेलं आपण आजपर्यंत बघितलेलं नाही. चंद्र, तारे, धरा, आकाश ह्या गोष्टींच्या सुरस कथा, कल्पना आजीच्या गोष्टीतून आणि बालकाव्यातून आलेल्या आहेत. त्या नुसत्या 'कल्पना'च असतात. आता मात्र शास्त्रीयदृष्ट्या माहिती देणारं 'आभाळाचे गुपित' हे पुस्तक बाजारात आलं आहे. अशा प्रकारचं हे पहिलंच पुस्तक आहे. यात काव्य असलं तरी कल्पनाविलास नाही, तर शास्त्रीय ज्ञान देण्याचा हेतू आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रा. देवबा शिवाजी पाटील यांनी हे अनोखं पुस्तक लिहीलं आहे. अवकाशातील दृश्य-अदृश्य वस्तू आणि संकल्पना काव्यातून समजून देणार्‍या २२ कविता यात गुंफलेल्या आहेत. 

'आकाशाचे गुपित' या शिर्षक कवितेत कवी महाशय या सर्व गोष्टींकडे डोळसपणे बघायला आणि विज्ञानाची कास धरायला सांगतात. 'आकाशगंगा' या कवितेत चौफेर आणि आवश्यक सर्व माहिती गुंफलेली आहे. आपल्या दिर्घिकेला 'मंदाकिनी' संबोधतात हे क्वचितच माहित असणार्‍यांना यातून ते कळते. अशाप्रकारची माहिती सर्वच कवितांमधून मिळत राहते. शालेय विद्यार्थ्यांनी ह्या सर्व २२ कविता पाठ केल्या तरी त्यांचा भूगोलाचा अर्धा अभ्यास झालेला असेल. १०० पानांचं ज्ञान विद्यार्थी एवढ्या कमी पानांच्या कविता मुखपाठ करून मिळवू शकतात हे नक्की !

अवकाशातील दृश्य-अदृश्य वस्तू यांव्यतिरिक्त गुरूत्वाकर्षणासारख्या संकल्पनांवर आधारित कविता वाचनीय आणि ज्ञानवर्धक कविता आहेत. अशा विषयावर लेखन करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्याबद्दल वस्तूनिष्ठ आणि अचूक शास्त्रीय ज्ञान असणे क्रमप्राप्तच आहे. देवबा सरांनी प्रत्येक कवितेत दुर्बोधता टाळून कविता गेय आणि माहितीपूर्ण केली आहे. प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे त्याबद्दल त्यांनी काहीच कमतरता जाणवू दिली नाही. काव्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यात त्यांचा हातखंडा आहेच, तसेच बालसाहित्यात अवीट ठसा उमटवलेला आहेच . त्यांच्या आतापर्यंतच्या बालसाहित्यावरच्या पुस्तकसंख्येवरून ते लक्षातही येते. लेखकाचा परिचय आणि ग्रंथसंपदेची माहिती पुस्तकात दिलेली आहे. त्यात ते साहित्य, विज्ञानाचा आणि शब्दविचारांचा 'सेवक' असल्याचे सांगतात. शेवटच्या पानावर लेखक आणि लेखनाबद्दल अमरावतीचे प्रसिध्द साहित्यिक प्रा. डाॅ. गिरीश खारकर यांचे शब्द पुस्तकाची समर्पकता विशद करतात. थोडक्यात, देवबासरांचा हा किशोर काव्यसंग्रह आभाळाशी संलग्नित विविध संकल्पना आणि घटना शब्दबध्द करतो. त्यासाठी त्यांनी आपल्या विज्ञानाच्या प्राध्यापकीचा आणि कवीकौशल्याचा पुरेपूर वापर केला आहे. पुस्तकाला प्रा. डाॅ. नितीन खर्चे यांनी प्रस्तावना लिहली आहे.

या सर्व कवितांना संतोष घोंगडे यांनी समर्पक रेखाटने आणि चित्रे दिली आहेत. छत्तीस पानाचे हे कलरफुल पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने संग्रही ठेवावे असेच आहे. ग्लाॅसी पेपरवर छापलेले सुंदर पुस्तक नाममात्र नव्वद रूपयात पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. 

पुस्तकाचे नाव:  आभाळाचे गुपित
कवी: प्रा. देवबा शिवाजी पाटील
प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन, पुणे
पाने: ३६
किंमत: ९० र.

समिक्षण: रघुनाथ सोनटक्के
        तळेगाव दाभाडे, पुणे
        मो. ८८०५७९१९०५

  • Share:

You Might Also Like

0 comments