प्रेमआठवणीचा लेखाजोखा 'आठव ओंजळ'

By Raghunath Sontakke - 10:02

पुस्तक परिचय

« प्रेमआठवणीचा लेखाजोखा 'आठव ओंजळ' »


माणसाच्या प्रेमभावना कितीही दाबल्या तरी त्या वयाच्या कोणत्याही टप्प्यावर उचंबळून येतातच. प्रेम हे माणसाला चिकटलेलं परिसच आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. प्रत्येक माणसाला प्रेम एका विशिष्ट टप्प्यावर मिळते. तरूणवयात मिळालेले प्रेम आयुष्याची शिदोरी होते. ते सतत आपल्या मनात बांधलेलेच असते. त्याच्या सुखद आणि कटू
ठवणी शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकजण जपत असतो. त्याला कधी आठवणींच्या रूपात घुमारे फुटतात. शब्दांना लपेटून ते जगासमोर आणण्याचं कसब प्रत्येकात नसलं तरी ते आठवणी म्हणून प्रत्येकजणच जपत असतो. अशा जपलेल्या शब्दबध्द आठवणींचा खजीना म्हणजे देविदास खडताळे यांचा 'आठव ओंजळ' काव्यसंग्रह.

प्रेम म्हणजे काय हे सांगतांना कवीने विविधप्रकारे विषद केले आहे. प्रेमाची वाटचाल कवीने वेगवेगळ्या कवितांतून रेखाटली आहे. प्रीतसहवासातील घटका लगेच संपतात आणि विरह कसा लांबतच राहतो हे साध्या शब्दात कवी सांगतो.
पल्या मनाला त्याच सुखद आठवणीत रमायला आवडते. असे आठवणींचे ओझे पेलतांना कधीही थकवा येत नाही आणि ही शिदोरी वाहतांना कधी हरलो नसल्याचं कवी म्हणतात.
एका कवितेत असं म्हटले आहे,
आठवणी तुझ्या
जपूनी दूर जाहलो मी
दु:ख ना दिले तुला
स्व-प्रीतीत मीच मेलो मी

ह्या आठवणी मनाला कधी ओलावा देतात तर कधी छळतातही. त्याचा कसा त्रास होतो हे पुढील ओळींवरून लक्षात येते.
  नका घालू फुंकर जखमावर आता
  आठवणींचा वणवा पेटला पण आता

  या प्रवासात विरह यातनांनी हरलो पण नाही. विरहाचा काळोख दूर करण्यासाठी ही आठवणींची पणती पुरेशी असते. ह्या आठवणी भावनांच्या कल्लोळातून मार्ग काढत पापण्यातून भिरभिरतात आणि मनाचा निचरा होतो. आठवणींचं हे काहूर जेव्हा छळतं तेव्हा कवी त्यांना शांत करायचा प्रयत्न करतो. एका कवितेत कवी म्हणतो,
गोठवून आठवणी गेल्या
विरह भयाण रित्या राती।।
दुमडून नशिब एकटेच गेले
भुक्कड रुढी समाजाच्या दाती।।

सगळं सांभाळून हे अनुभवाचं गाठोडं आपण वाहत असतो. प्रेमींची प्रीत फुलत असताना तिला समाजाची नजर लागते किंवा संशयाचा खडा पडला कि दुरावा येतो. 'नवआयुष्य' कवितेत कवीने लिहले आहे कि प्रीत जर नशिबाच्या काचपात्रात ठेवली तर ती जातांध, रूढी परंपरांच्या क्रोध नखांनी दुंभगल्याशिवाय राहत नाही. प्रेम जेव्हा नशिब, संशय किंवा समाजाच्या जाचक बंधनांनी तुटते तेव्हा माणसाच्या मनाला अतोनात यातना सहन कराव्या लागतात. रितेपण जाणवू लागते. मन भांडू, झगडू लागते. ऐकमेकांना एेकमेकांच्या मनात सामावू लागते. विरहाचा हा क्षण कवीने 'मनहदय' कवीतेत रेखाटला आहे.

प्रेमात पहिलं प्रेमपत्र आपण जपून ठेवलेलं असतं. त्यातील शब्द न् शब्द हृदयावर कोरला जातो. प्रेम फुलत असतांना एकत्र घालवलेली सकाळ-संध्याकाळ, एकत्र केलेला प्रवास आणि सहवासातला घालवलेला हरेक क्षण असाच मनाला चिकटून राहतो. मग ते बसच्या तिकिटांवर ऐकमेकांनी लिहलेली नाव का असेना! हेही कवी आपल्या काही कवितांमधून लिहायला विसरलेला नाही.

या सर्व प्रेमआठवणीचा लेखाजोखा 'आठव ओंजळ' या काव्यसंग्रहात मांडलेला आहे. वयाच्या चाळीसाव्या वर्षापासून साहित्यलेखनाला सुरवात केल्यावर आता देविदास खडताळे सरांचा हा कवितासंग्रह आला आहे. 'कंगोरे मनाचा' यानंतर त्यांचा हा दहावा काव्यसंग्रह आहे. यातील त्यांच्या कविता ऐंशीच्या दशका लिहलेल्या कविता आहेत. यातील बहूतांश कविता प्रेमविरह, आठवणी आणि प्रेमविरहाने झालेल्या आघातांवर आधारित आहेत. एकूण ४० कवितांचा हा संग्रह वाचल्यावर त्यांच्या प्रेमभावना किती उत्कट आहेत याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. संग्रही असावे असे हे पुस्तक आहे.

पुस्तकाचे नाव: आठव ओंजळ
कवी: देविदास खडताळे
प्रकाशक: वैशाली प्रकाशन, पुणे
पाने: ४०, किंमत: ६० रू.

• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
  मो. ८८०५७९१९०५


 
१८ ऑगस्ट २०१९, दै. सामना, उत्सव पुरवणीत प्रकाशित
Raghunath Sontakke













 

 

  • Share:

You Might Also Like

0 comments