अस्वस्थ मनाचा वेध घेणारा कवितासंग्रह: 'कर्णाच्या मनातलं'
By Raghunath Sontakke - 05:32
« पुस्तक समिक्षण »
अस्वस्थ मनाचा वेध घेणारा कवितासंग्रह: 'कर्णाच्या मनातलं'
कवी देविदास सौदागर यांचा 'कर्णाच्या मनातलं' हा पहिलाच कवितासंग्रह नुकताच हातात आला. शिर्षकावरूनच हा संग्रह वेगळा असेल असे वाटले होते, आणि ते खरेच आहे. कवीने कर्णाच्या जागी स्वत:ला ठेवून मनाची दारं खुली केली आहेत. कर्णाची द्विधा, हतबलता आणि हरवलेपण त्यांनी त्यांच्या कवितांमधून उत्तमरीत्या रेखाटले आहे. 'हद्द' या कवितेत ती अवस्था ते कसे रेखाटतात, ते बघा:
रक्ताचं नात मोठं?
कि, जीव लावलेलं नातं मोठं?
उत्तर मिळेना झालंय
आजचं समाजमन बघितलं कि आपल्या प्रत्येकाला हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
जीवनातील कटशाहात स्वत:चा स्वाभिमान कसा जपला हे 'डाव-प्रतिडाव' या कवितेत कवीनं नमुद केले आहे. तसेच आपल्या जीवनाचा 'प्रवास' कसा झाला हेही मांडले आहे. या दुनियेच्या डावात पाठीत वार झाल्याची 'व्यथा' त्यांच्या कवीतेत दिसून येते.
पाठीवर वार करणारे
ते तर योध्दे शूरवीर होते
तर शेवटच्या कडव्यात
ते श्रेष्ठ धनुर्धर होते
पाठीतून हृदयात त्यांचे वार होते
अशीच अवस्था कवीने 'कांतैय', 'सूतपुत्र' आणि 'मुखवटे', 'घाव' या कवितांमधून रेखाटली आहे. जीवनातील वाईट अनुभवाबद्दल कवी भरभरून लिहितो.
अशात त्याची अवस्था
काळजात अडकले शब्द माझ्या
हुंदके बाहेर कसेतरी फुटू लागले
अशी होऊन जाते.
मग अशा अवस्थेत सामान्य माणसासारखी नशीबाला दोष देण्याची वेळ आणि हतबलताही कवीला येते.
'नशीब' कवितेत कवी म्हणतो,
सगळ्यांचं उजळलं आयुष्य
माझ्याच वेळेस तेल नव्हतं पणतीत
जगात दिसणारा स्वार्थ बघून कवीलाही
सोडावं वाटतं आता
म्हणणं माझं माझं
फेकून द्यावं मनावरचं
मोहाचं ओझं
असं वाटतं.
मात्र 'हस्तरेखा' कवितेत कवीचा आशावाद आणि कष्टावरची 'श्रध्दा'ही दिसून येते. भविष्य घडविण्याची ताकद फक्त हातात आहे हा विश्वास आणि इतर कवितांमधून दिसणारा 'स्वाभिमान' कवीला जगण्याचं बळ देतांना दिसतो. स्वाभिमान नसणं म्हणजे खरं मरण आहे हे कवी सांगायला विसरत नाही.
जीवनातील आव्हानं पेलण्याची धमक दाखवतांना कवी म्हणतो,
पाऊल टाकीन तिथं
जिंकण्याची धमक अाहे
माझा प्रामाणिकपणा
हे यशाचे गमक आहे
जातिव्यवस्थेबद्दलही कवीने भाष्य केले आहे.
काही वेगळ्या कविताही यात आहेत. त्यात प्रेमाची झलक आहेच. आठवणीबाबतीत कवी म्हणतो,
आठवणीचे किती
रूततात काटे
आठवणीला किती
फुटतात फाटे
प्रेमासोबत श्रृंगार आला नाही तर नवलच!
किती हे सुंदर
काळे काळे
बोलतात बघ
हे तुझे डोळे
प्रेमात कवी राधाही बनुन जातो 'कृष्ण' या कवितेत! 'सुर्यभक्ती' या कवीतेतून कवी प्रेयसीबद्दलची आसक्ती आणि भक्ती दाखवुन देतो.
त्यांचा हा पहिलाच कवितासंग्रह असून यात ३७ कविंतामधून त्यांचं मन, दशा, कोलाहल जवळून अनुभवता येते. बर्याच कवितांवर गझलेचा प्रभाव आहे किंवा गझलसदृशता आहे. त्यामुळे गेयताही ओघाने येतेच. मात्र कुठेकुठे मुक्तछंदाकडे झुकल्यासारखे वाटते. भावना व्यक्त करायला त्याचं बंधन किंवा व्यत्यय आला असे कधी झालेले जाणवत नाही आणि वाचकही गोंधळून जात नाही. मनाची दुर्दशा तसेच अंतर्मुखतेकडे झुकणार्या कविता असल्यातरी त्यातुन आशावादही डोकावतो.
हेच कवी देविदासजींच्या कवितांचं यश आहे. पहिला संग्रह असला तरी जुन्याजाणत्या कवीसारखी कवितांची गुंफन केली आहे. शंकर कसबे यांनी पुस्तकाला लिहलेली प्रस्तावणा पुस्तकाचा सारांश व्यक्त करते, तर उत्तम सदाकाळ यांचे शब्दही तशीच भावना व्यक्त करतात. मुखपृष्ठ समर्पक, पुस्तकाची बांधणी सुबक आहे. त्यांना पुढिल साहित्यलेखनास सुभेच्छा!
पुस्तकाचे नाव: कर्णाच्या मनातलं
कवी: देविदास महादेव सौदागर, तुळजापूर
प्रकाशक: थिकं टॅंक पब्लिकेशन, सोलापूर
पाने: ४४
किंमत: ८० ₹
समिक्षण: रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905

0 comments