तो पाऊस
(ललित)
आता
हे नेहमीचंच झालंय. दरवर्षी पाऊस आला, की तुझ्या आठवणी मनाला पुन्हा
छळायला लागतात. आता ते वय राहिलं नाही असं म्हणता येणार नाही. आता कुठं
एखादा केस पांढरा व्हायला लागलाय. मी तर तुझ्या प्रेमात अजून तरूणच आहे.
त्या आठवणी, ते प्रसंग जणू कालच घडलेत असं वाटतं. दिवस, वर्षे कसे संपलेत
कळलेच नाहीत. पण तुझ्या आठवणी अजून ताज्याच आहेत. तू कशी दिसत असशील, असा
विचार मनात येऊन अपशकूनच करून जातो. तुला जसं पाहिलं होतं, अजूनही तू मला
तशीच भासतेस. तू सोडून गेलीस तेव्हाचं तुझं रूप माझ्या डोळ्यात साठवलं ते
अगदी तसंच जपून ठेवलंय मी ! त्याच्यावर ना कसला ओरखडा ना जुनेपणाचा गंध
आहे. अगदी पुस्तकं जपत आलोय तसंच तुलाही जपलंय मी. पुस्तक उघडलं, की कसं
एक-एक पान वाचत सुटतो तसं तुझ्या आठवणींची पानं उलटत असतो पाऊस आला की ...
तो आला की मन कसं जुन्या कृष्णधवल जमान्यात जातं.
काळ
कसा आपल्या अायुष्यातील प्रसंग निमुटपणे सोडून जातो. ना त्याला थांबवता
येतं ना हवं तसं वागायला सांगता येतं. बस्स... तो हळूहळू सरकत जातो आणि आपण
त्याच्या हातची लेखनी होऊन जातो. सोंगट्यांसारखे आपण कसे वागतो तेच
आपल्याला कळत नाही.
पण
मनाची आणखी एक करामतच म्हणा की, अजूनही मी ते क्षण जगतो अाहे. पावसाचा गंध
त्या क्षणांना परत माझ्यासमोर उभं करतोय. जणू त्यालाच माझी काळजी वाटत
असावी. सखाच तो माझा ! किमान वर्षातून काही काळ माझ्यासोबत त्या आठवणी
ओल्या करतो. कदाचित जखमाही यामुळेच 'ओल्या' करतात असे म्हणत असावेत. ते
जुनं दु:खही मनाला आनंद देऊन जातं. मात्र सुखाचे क्षण मनाला अत्युच्च
आनंदाची सैर घडवुन आणतात.
आजही
पावसाचा तसाच गंध येतोय. आपण भेटायचो त्या पावसात, अगदी तसाच गंध !
गारवाही तसाच जाणवतो. गारवा तुला सहन व्हायचा नाही.आपण भेटायचो त्या
हिरव्याकंच, वाढलेल्या, बांधावरल्या झाडाखाली. आपलं प्रेमही तसंच फुललेलं
होतं.त्याला जसा पानाफुलांचा बहर होता तसाच आपल्या प्रेमालाही होता.चार
मैलावरूनही ते झाड ओळखु यायचं. होतंच ते वेगळं. कितीतरी भेटी आपल्या त्याच
झाडाखाली झाल्या. आता ते झाडंच आपल्या प्रेमाचं साक्षीदार उरलंय. ..
साक्षी आहे आपल्या प्रेमाला
ते बांधावरलं हिरवं झाड
श्रावणातल्या सरीसवे सखे
ती आठवण तरी काढ
अशा
कित्येक ' वेळा ' आपण त्या झाडाखाली अनुभवल्या. आपल्या भेटी घडाव्यात
म्हणूनच जणू पाऊस यायचा. तुला ढगातून गरजुन धाक दाखवायचा.तुला भिजवणे हे
त्याचे निमित्त होते. तू भिजून माझ्या मिठीमधे शिरतेस हे त्याला चांगलं ठाऊक
होतं.
तू भिजायला येशील म्हणुन
रोज पाऊस बरसतो
पाहण्या मिठीमधे तुला
ढगामधूनतून गरजतो
गार
वारा सुटायला लागला की, तू शिरशिरायचीस,भिजायचीस. तुझी आसरा शोधायला धावपळ
बघून मला तू जवळ येशील याची जाणीव व्हायची. मी आधीच झाडाखाली थांबलेलो
असायचो तुझ्या येण्याची वाट बघत ! तसं तुझं आरसपाणी रूपडं मी नेहमीच
बघायचो.पण त्या पावसात त्यावर साज चढायचा. कोणतेही अलंकार वगैरे तुझ्या
देहावर नसतांनाही तू अप्सरेहून कमी नसायचीस. तुझा देह म्हणजे अंजिठा-वेरूळच
! तुच अंजिठ्याची प्रेरणा असावीस ...
भिजलेला तुझा तो पदर
होता बेभान ओला पाऊस
रूप तुझं घायाळ करे मला
म्हणायचो नको काही लेऊस
असं माझं मन नेहमी म्हणायचं.
तू
कधी माझ्या मिठीमधे शिरतेस असं मला वाटायचं. तुला कवेत घेण्याएवढं सुख
अजुन तरी मला गवसलेलं नाही. मला जशी मिठी प्यारी होती तशी तुलाही.
तुझ्यासोबत
मीही मग तो उत्सव साजरा करायचो. परमोच्च सुख अनुभवायचो आपण दोघं. पुर्णत्व
यायचं आपल्या दोघांना.एकच व्हायचो आपण. त्यावेळेसचा तुझा स्पर्श किती गोड
असायचा हे अजुनही मला सांगता येत नाही. त्या मिठीत कोण वेगळं हे तर सांगताच
येणार नाही.फक्त श्वासच दोन असायचे.बाकी सारं एकच ! तूला गोंजारतांना
तुझ्या मुख कमलावरची लाली अजूनही त्या उगवत्या सुर्याला मिळवता आली नाही.
तुझा चंद्रासारख्या चेहर्यावर चंद्रही जळायचा.तुझा चंद्र माझ्या दोन्ही
हातात घेऊन पौर्णिमा साजरी केली होती आपण...
पावसासोबत
वारं झाडाच्या फांद्याना हेलकावे मारायचं. त्यावरून पावसाचे थेंब आपल्या
अंगावर बरसायचे तेव्हाच कुठे आपल्याला भान यायचं.तुला जवळ ओढताना तू 'नको'
म्हणायचीस. लटकेच लाजायचीस. खरंतर तुलापण दूर व्हावसं वाटायचं नाही.
तुला आठवत असेल
आपलं पावसात भिजणं
बिलगण्या मिठीमधे
तुझं खोटं -खोटं लाजणं
तू
माझ्या कुशीत अशीच राहावीस, असा मोह मला नेहमीप्रमाणेच न आवरणारा.
पावसाच्या त्या बरसण्यात मला अतीव आनंद वाटायचा. हे सर्व नाट्य होतं की
काव्य होतं, हाच फरक मला कळला नाही. तो पाऊस जणू माझं ऐकायचा. तो ओसरायचा
थोड्यावेळाने. झाडाच्या बुंध्याआड सुरक्षित आसरा शोधल्यावर माझ्या कवेतल्या
उबेने तुला झोप यायची नकळत !
पाऊस आला की
तू खुप भिजायचीस
माझ्या उबदार कुशीत
गुपचूप निजायचीस
वार्याने
खिडकी वाजली आणि भानावर आलोय मी.पुरता विलिन झालो होतो त्या क्षणांच्या
विळख्यात. हे सर्व गोडगोड आठवत असतांना मनाला दु:खाची कळही जाणवली. तुझ्या
विरहाचं दु:ख स्पष्ट आठवतंय.
काही
वर्षे गेली असतील. त्या दुसर्या साली तोच पाऊस आणि तेच झाड. त्या दिवशी मी
एकटाच त्या झाडाखाली तुझी वाट बघत बसलो होतो. आज पाऊसही जोरात फेर धरत
होता.सरीवर सरी बरसत होत्या.गडगडाट नव्हता. होती फक्त बरसात. मुसमुसत होता
जणू.माझ्याआधी त्यालाच काहीतरी कुणकुण लागली होती. निरव उदासिनता होती
त्याच्या बरसण्यात.तू धावतच आली होती माझ्याकडे. पण त्या धावण्यात ओढ
नव्हती. तुझा चेहराही मलूल आणि खिन्न वाटत होता. तुला दुरूनच मी आवाज दिला.
तू मात्र नि:शब्द चालत राहीली ओढल्यागत. त्या शेतातल्या बांधावर ते झाड हे
सारं मुकपणे बघत होतं. पाऊसही लटकेच बरसत होता. तु ओल्या देहाने माझ्याकडे
येत होतीस. पण काय औदासिन्य होतं त्यावेळेत काय माहीत ? तू मिठीत
विसावलीस. मला बरं वाटलं.मिठी पुर्वीसारखी घट्ट नव्हती. माझ्या मनात काहूर
माजलं.शंकेने घरं केलं. कपाळावर रेषा उमटल्या. डोळ्यांना लवतं केलं. तुझा
चेहरा ओंजळीत घेतला. तू माझ्या नजरेला नजर भिडवू शकली नाहीस. पावसाचे थेंब
डोळ्यांच्या कडांवर कसे विसावले हेच कळेना ! तुला बोलतं केलं.पण तू नि:शब्द
! तू मात्र पापणी वर करायला तयार नव्हतीस. शेवटी पापणीत साठलेलं ओघळायला
लागलं.
वेळ सरकत होता पण
तुझ्या ओंठातून सत्य बाहेर पडत नव्हतं. शेवटी माझ्या हट्टापुढे तू
वैतागलीस. सत्य कटूच होतं.दूर जाण्याचं ! घात केल्यागत धस्सं झालं.
देहातून वीज चमकली.मी तुला आळवीत राहिलो. तुझ्यासाठी माझं सर्वस्व आता काही
मोलाचं नव्हतं.
तू होतीस अन् मी होतो
त्या शेताच्या बांधावर
धाय मोकलून रडली होतीस
पावसात माझ्या खांद्यावर
तुला
विसरण्याचं वचन मागितलं तू ! माझ्याकडून मलाच हिरावुन घेतलं. तूझ्या
अश्रूंपुढे मला हार मानावी लागली. निदान तुला भासवायला तरी हे करणं मला भाग
होतं.आळवीत राहीलो. रडत राहिलो. अश्रू आणि पाऊस रडत राहिले. तुझं थांबणं आता
शक्य नव्हतं.
म्हटलो होतो तुला सखे
तू दूर नको जाऊस
आळवीत होता तुला
तो बरसणारा पाऊस
अश्रुच
आता माझ्या सोबतीला होते. तुझं देणं होते ते.काहीतरी निशाणी असावी म्हणून
माझा हट्ट तू पुर्ण केलास जणू ! न आवडणार्या गोष्टीला गोड मानुन
घेतलं. आताही सोबत आहेत. तुझी आठवण आली की लगेच सोबत करतात डोळ्यांची.
आठवणीसोंबत टाचणी मारून ठेवल्यागत आहेत ते. पाऊस असतो दरवर्षी सोबतीला
त्यांना फिरवुन आणायला. सैर करवुन आणायला तुझ्या आठवणीच्या जगात ! !
• रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. ८८०५७९१९०५