« पुस्तक समिक्षण »
भरभरून आनंद देणार्या बालकवितांचा संग्रह 'आपण सारे...'
आजकालची पिढी खुपच टेक्नोसॅव्ही झाली आहे.अगदी लहान बाळही कसे मोबाईल हाताळतात,हे मोठ्या गर्वाने सांगणारी जोडपी आहेत. व्यस्त जीवनात मुलांचा आनंद, मनोरंजन म्हणजे टिव्ही, कार्टून, मोबाईलपुरतेच मर्यादीत झाले आहे. शिक्षणाचा रट्टा, करिअर यात बालपण कधी निघून जाते हे या पिढीला कळतच नाही. मात्र काही सुजाण पालक आणि शिक्षक अस्सल बालपणाचा आनंद बालकांना मिळवून देत असतात. चित्रकला, काव्य, नृत्य, संगीत याचा जीवनानंद त्यांना मिळतो. असे बालपण आपण प्रत्येकाने जगावे असे वाटते. याचाच एक पैलू म्हणजे मुलांना काव्यात्मक रूपातून मिळणारा आनंद. अगदी तान्ह्या बाळालासुध्दा अंगाईगीत ऐकल्याशिवाय झोप येत नाही. तेव्हापासूनच त्याला काव्याची गोडी लागत असते. मग आजीच्या गोष्टी, मामाचा गाव, प्राण्यांचं जग हे सर्व कथा-गोष्टींमधून ऐकायला मिळते. शाळेच्या अभ्यासक्रमातून वा बाहेरच्या जगातून का होईना हे सर्व साध्य होत असते. हे गोड अनुभव, जग आपल्या आयुष्यभरात आपण जपून ठेवत असतो. प्रत्येकात जसे स्त्रीमन असते तसेच बालमनही असते. ते प्रत्येकाने जगावे आणि आपल्या बालपिढीलाही जगू द्यावे. ही बालमनाची भूक भागवणे पालकांचे, शिक्षकांचे, माध्यमांचे काम आहे. यात साहित्यिक आपल्या कल्पनाशक्ती आणि शब्दसामर्थ्याचा वापर करुन बालकांना रिझवत असतात. त्यातून मुलांचे रंजन, मूल्यांची शिकवण आणि कल्पनाशक्तीला वाव मिळतो.
अशाच बालमनाचे जीवनविश्व समृद्ध करणार्या श्री. उमेश मोहिते लिखीत बालकवितांचा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. स्वत: शिक्षकी पेशा धारण केलेला असल्यामुळे मुलांचे विश्व काय असते, आणि ते कसे समृध्द करता येईल याची त्यांना चांगली जाण आहे.आपल्या शाळेतील काही लिहित्या मुलांचे साहित्य वर्तमानपत्रांकडे पाठवून प्रकाशित करून घेणे हा त्यांचा विशेष त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून जपला आहे. मुळ ग्रामीण कथा -कांदबंरीकाराचा पिंड असला तरी त्यांनी गेल्या दोनेक वर्षात हेतूपुरस्पर बालसाहित्याचे लेखन केले आहे. त्यांच्या ह्या बालकविता वेळोवेळी नामाकिंत दैनिकात आणि मासिकात प्रसिद्ध झाल्या असल्या तरी मुलांना बालकवितांचा एकत्रित ठेवा 'आपण सारे ' या पुस्तकाच्या रूपाने मिळाला आहे. यात एकूण २९ बालकविता असून त्या सर्व बालमनाचे वेगवेगळे पैलू आणि विश्व उलगडून दाखवतात. स्वप्नरंजनासाठी ते मुलांना परीच्या दुनियेत सैर करवून आणतात तर चांगलं रंजक स्वप्नही दाखवतात. प्रत्येक कवितेत गंमत असायलाच हवी तरच मुलांना आनंद मिळतो, ते तत्व त्यांनी प्रत्येक कवितेत पाळले आहे. शिवाय केवळ स्वप्नरंजन न करता मुलांवर त्यातून संस्कारही बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्ष जगातील व्यक्ती, सण, गोष्टींचा आधार घेतला आहे.जसे की, घर, बाबा, बहीण, आई, गुरूजी या सर्वांबद्दल मुलांना विशेष प्रेम असते. म्हणूनच ते आईबद्दलचं प्रेम ते व्यक्त करतात.बाबाबद्दल गर्वाने लिहतात, तर बहिणीबद्दल असलेली विशेष मायाही त्यांनी टिपलेली आहे.
बालकांना गोष्टी ऐकायला आवडतात. मग त्या आजीने सांगितल्या तर काय मज्जा ! त्यामुळे आजीचे वेगळेच स्थान असते. बालकांच्या मनातील मायावी छोटंसं घर मस्त खेड्यात वसलेले आहे. आणि हे त्यांच्यासाठी जगातील सर्वात सुंदर ठिकाण आहे. मुलांच्या मनातील शाळेतल्या गुरूजीबद्दलची खुपच छान भावना रेखाटली आहे. सवंगडी, मित्र यांच्यासोबतची मजा 'ऐक ना रे भाऊ', 'चला दोस्तांनो', 'ऐक माझ्या मित्रा' या बालकवितेतून वाचायला मिळते. यासोबतच रविवारही मुलांना खुप आवडतो. त्या दिवसाची आतुरता आणि आवड 'रविवार' कवितेत वर्णिली आहे. प्रत्येक बालकाला मामाचा गाव खुपच सुंदर वाटत असतो. मुलं सुटी घालवण्यासाठी तिकडे धाव घेतात. जवळच्या व्यक्ती, प्राणीजगत, शाळा, मित्र, मजा हेच लहानमुलांचे विश्व असते. शिवाय काही विशेष गोष्टींचे अप्रुप आणि आकर्षणही मुलांना वाटत असते. मग सुटी, पाऊस, पर्यावरण हे आलेच! पावसाबद्दल दोन कविता संग्रहात आहेत. बालमंडळी पावसात कशी मौजमजा करतात ते या कवितांत वाचायला मिळते.
जोडीला चिमणी, माकड अशा दोन प्राण्यांवर आधारित कविताही आहेतच. मुलाच्या तोंडी असलेली सहज -सोपी भाषा वापरून ह्या कविता समृद्ध केल्या आहेत. याशिवाय मुलांमुलीमधे भेद करू नये, भ्रुणहत्या, झाडे वाचवणे किती आवश्यक आहे हे मुलांच्या अंतरंगातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
एकंदरीत मौजमजा, आवडत्या व्यक्ती, स्थळे आणि प्राण्यांच्याबद्दल भरभरून बोलणार्या कवितांचा आनंद घ्यायला हे पुस्तक वाचायलाच हवे.
नांदेडच्या इसाप प्रकाशनाने हा बालकाव्यसंग्रह अतिशय देखण्या आणि तजेलदार स्वरूपात प्रकाशित केला आहे. प्रमोद दिवेकर यांचे आकर्षक मुखपृष्ठ आणि कवितांना काढलेली समर्पक रेखाचित्रे पुस्तकाला देखणं रूप देतात.
पुस्तक: आपण सारे... (बालकविता)
कवी: श्री. उमेश मोहिते
पाने: ४० मूल्य: रु. ५०
प्रकाशक: इसाप प्रकाशन, नांदेड
समिक्षण: रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905